विमा म्हणजे काय, विम्याचे प्रकार किती, विमा पॉलिसी मराठी
Insurance Information In Marathi – आपण अनेक प्रकारच्या विमा बद्दलच्या माहिती देणाऱ्या जाहिराती दूरदर्शनवरती पाहत असतो. पण अजूनही बऱ्याच जणांना विमाबद्दलची संपूर्ण आणि योग्य ती माहिती नसते. आज आपण आपल्या या लेखात विमाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे समाविष्ट केले आहेत.
अनुक्रमणिका
विमा म्हणजे काय मराठी | Insurance meaning in Marathi
इन्शुरन्स म्हणजे काय – विमा ही एक अशी सुविधा आहे ज्यामध्ये ज्या कारणासाठी विमा काढला आहे, त्या बाबतीतली एखादी विशिष्ट घटना घडल्यास विमाकर्ता विमाधारकाला किंवा त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला विम्याची रक्कम देण्याचे वचन देतो. उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या व्यक्तीने त्याच्या दुकानाचा विमा काढला आहे. भविष्यात त्या दुकानाबाबतीत काही नुकसान झाले, जसं की दुकानाला आग लागली किंवा दुकानात चोरी झाली, तर विमा कंपनी त्या नुकसानाची भरपाई करून तुम्हाला परत तुमचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देतात. विमा हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आजकाल संकट काही सांगून येत नाही. असे असताना जर आपल्या महत्वाच्या गोष्टींवर किंवा आपल्या स्वतःचा विमा काढला असेल तर तुमचे आयुष्य सुरक्षित करण्यास तुम्हाला मदत होते. यामुळे विमा काढणे हे आजकाल खूप महत्वाचे झाले आहे.
विमा का घ्यावा? | Why should we take Insurance?
१. विमा योजनेमुळे विमाधारकाला भविष्यात होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळवता येते.
२. या सुविधेचा वापर केल्यामुळे आपल्याला आपले भविष्य सुरक्षित करता येते.
३. व्यवसायात विविध कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करणे सोपे जाते.
४. ज्या गोष्टीवर किंवा ज्या कारणासाठी विमा काढण्यात आला आहे, त्याची चिंता करावी लागत नाही.
५. विम्यासाठी कमी खर्च होत असल्यामुळे कमी खर्चात मोठ्या नुकसानीपासून संरक्षण होण्यास मदत होते.
६. आपण विमा ज्या गोष्टीसाठी किंवा कारणासाठी काढला आहे, त्याचे काही कारणाने नुकसान झाल्यास होणाऱ्या आर्थिक खर्चाचा भार पूर्णपणे किंवा अंशतः विमा कंपनी उचलते.
विमा पॉलिसी म्हणजे काय? | What is the meaning of Insurance Policy?
Vima policy information in Marathi – विम्यासाठी अर्ज करताना एक विमा धोरण अर्जदाराला देण्यात येते. प्रत्येक विमा कंपनीच्या ते देत असलेल्या विम्याबद्दल अटी आणि शर्थी असतात. त्या सगळ्या अटी आणि शर्थी ज्या दस्तऐवजामध्ये नमूद केलेल्या असतात, त्या दस्तऐवजाला विमा धोरण असे म्हणतात. विमा धोरणामध्ये विमाधारकाला देण्यात येणाऱ्या विम्याची रक्कम, त्याबद्दलची कंपनीची असलेली नियमावली ही सगळी महत्वाची माहिती नमूद केलेली असते. ही माहिती कंपनीप्रमाणे बदलत असते. म्हणूनच कोणताही विमा घेताना त्यांचे विमा धोरण व्यवस्थितरीत्या आणि काळजीपूर्वक वाचून घेणे खूप महत्वाचे आहे.
विम्याचे प्रकार किती? | Types of Insurance
विम्याचे विविध प्रकार आहेत. ते प्रकार आणि त्याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.
१. जीवन विमा – सर्वात महत्वाचा जीवन विमा म्हणजे काय? जीवन विमा (Jivan Vima) म्हणजेच लाइफ इन्शुरन्स. या विम्यामध्ये विमा कंपनी आणि विमाधारकामध्ये असा करार होतो की, विमाधारकाचा काही कारणांमुळे अचानक मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटूंबाला त्याच्या पश्चात निश्चित रक्कम देण्यात येईल. ह्या कराराप्रमाणे तसे करण्याचे आश्वासन विमा कंपनी विमाधारकाला देते. ह्या रक्कमेमुळे विमाधारकाच्या कुटूंबाला त्याच्या पश्चात येणाऱ्या आर्थिक संकटांचा सामना करायची एक सुरक्षितता व हमी विमा कंपनी विमाधारकाला देते. ही ठराविक रक्कम हा विमा घेताना ठरवण्यात येते आणि त्या रक्कमेप्रमाणे विशिष्ट रक्कम विमाधारकाला विशिष्ट काळासाठी भरावी लागते.
२. गृह विमा – गृह विमा म्हणजेच होम इन्शुरन्स.. स्वतःच घर असणे हे प्रत्येकाचेच स्वप्नं असते. पण त्या घराला संकटांपासून दूर ठेवता येईल की नाही याबद्दल आपल्या मनात शाश्वती नसते. अशा वेळी आपल्या घराचा देखील विमा काढला असेल तर तो निर्णय भविष्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरू शकतो. आजकाल संकट, अपघात हे काही सांगून येत नाही. अशा वेळी आपले घर सुरक्षित असेल तर ते केव्हाही चांगलेच असते. आपल्या घराचा नैसर्गिक आपत्ती जसं की, भूकंप, पूर आणि कृत्रिम आपत्ती जसं की, आग, वीज, चोरी यापासून बचाव करणे खूप गरजेचे आहे. म्हणून या सगळ्या आपत्तींमुळे जर आपल्या घराचे काही नुकसान झाल्यास विमा कंपनी विमाधारकाला त्या नुकसानीची पूर्ण रक्कम किंवा अंशतः रक्कम भरपाई करून देते.
३. आरोग्य विमा (मेडिक्लेम पॉलिसी मराठी) – आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स. आरोग्य विमा घेण्याचे बरेच फायदे आहेत. तुमच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च भागवण्यासाठी किंवा एखादा असाध्य रोग झाल्यास त्याबाबतीतला खर्च करण्यासाठी तुम्ही आरोग्य विमा घेऊ शकता. आजकाल आजारपण किंवा असाध्य रोग हे अचानक होतात. आरोग्य विमा काढल्यास आपल्या किंवा आपल्या कुटूंबातील सदस्यांना भविष्यात काही आजारपण आल्यास त्यांच्या उपचारांसाठी जो खर्च लागतो, तो भरण्यास मदत होऊ शकते. या विम्याचा मुख्य उद्देश हाच आहे की, आजारपणाला येणारा खर्च मिळवून देणे. आपण सामान्य आरोग्य विमा किंवा असाध्य आजारासाठी विशिष्ट विमा धोरण देखील घेऊ शकतो.
४. वाहन विमा – वाहन विमा म्हणजेच कार इन्शुरन्स. आपल्या देशात कायद्यानुसार वाहनाचा विमा काढणे गरजेचे आहे. जर तुम्ही वाहनाचा विमा न काढता वाहन रस्त्यावर चालवल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तसेच कायदेशीर प्रक्रियेला देखील सामोरे जावे लागू शकते. तुमच्या वाहनाचे कोणत्याही कारणाने नुकसान झाल्यास जसं की आग, वाहन चोरीला जाणे, अपघात यासाठी वाहन विम्याचा उपयोग होऊ शकतो. शिवाय एखाद्या व्यक्तीला दुखापत झाल्यास किंवा एखादा आपल्या वाहनातून मरण पावला असेल, तर त्या व्यक्तीला वाहन पॉलिसीचा फायदा जास्त प्रमाणात होतो. हा विमा थर्ड पार्टी अंतर्गत संरक्षित असून तुमच्याकडे जर दुचाकी किंवा चारचाकी वाहन असल्यास त्याचा विमा काढून घेणे गरजेचे आहे.
५. पीक विमा – शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा पीक विमा म्हणजे काय? पीक विमा म्हणजेच क्रॉप इन्शुरन्स.. कृषी कर्ज घेताना शेतकऱ्यांनी पीक विमा काढणे हे नवीन नियमांनुसार आवश्यक आहे. या विम्यामध्ये पिकाचे काही कारणांमुळे जसं की आग, पूर किंवा इतर कोणत्या आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा कंपनी त्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्याला करून देते. पीक विमा कंपन्यांचे नियम हे कडक असल्याने नुकसानीच्या किंमतीनुसार नुकसान भरपाई न मिळाल्याने या विम्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे.
६. यात्रा विमा – यात्रा विमा म्हणजेच ट्रॅव्हल इन्शुरन्स.. यात्रा विमा प्रवासाच्या वेळी झालेल्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानापासून संरक्षण करतो. जर एखादी व्यक्ती कोणत्या कामासाठी किंवा प्रवास करण्यासाठी इतर ठिकाणी किंवा विदेशात गेली आणि जर त्यावेळी त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा तुमची कोणती वस्तू हरवली आणि जर तुमचा यात्रा विमा काढला असेल, तर तुम्हाला त्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून मिळते. प्रवासी विमा हा फक्त त्या प्रवासापुरताच मर्यादित असतो.
७. अपघात विमा – अपघात विमा करार किती वर्षाचा असतो. अपघात विमा म्हणजेच ऍक्सिडेंटल इन्शुरन्स.. रस्त्यांवर वाहनांची संख्या ही वाढत चालली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढते आहे. तुम्ही रस्त्यावरून चालताना तुमचा अपघात झाल्यास तुमचा जर अपघात विमा काढला असेल तर विमा कंपनी विमाधारकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या नुकसानीची भरपाई करून देते. अपघाताबद्दलचा सगळा खर्च हा विमा कंपनी उचलते. सर्वसाधारणपणे अपघात विमा करार हा एक वर्षाचा असतो.
विमा योजनेमधील काही महत्वाच्या संज्ञा | Important Definitions in Insurance Plan
विमा योजनेबद्दल व्यसस्थितरित्या आणि योग्यप्रकारे जाणून घेण्यासाठी त्यातील काही महत्वाच्या संज्ञा जाणून घेणे महत्वाचे आहे. म्हणजे तुम्हाला विमा योजनेबद्दल पूर्णपणे माहिती घेताना अडचणी येणार नाहीत.
१. विमा (Insurance) – विमा हा विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यामधील एक करार असून विमाधारकाचे काही पूर्वनिश्चित कारणामुळे नुकसान झाल्यास विमा कंपनी त्याला त्या नुकसानीची पूर्णतः किंवा अंशतः भरपाई करून देते.
२. विमा कव्हरेज (Insurance Coverage) – विमाधारकाला ज्या कारणासाठी विमा कव्हर मिळते, त्याला विमा कव्हरेज असे म्हटले जाते.
३. प्रीमियम (Premium) – विमा सुरक्षा कवचाच्या बदल्यात विमाधारकाला सुनिश्चित कालावधीसाठी काही रक्कम हप्त्याने किंवा पूर्णतः विमा कंपनीला भरावी लागते, त्या रक्कमेला प्रीमियम असे म्हटले जाते.
४. पॉलिसीधारक (Policyholder) – विमा कंपनीकडून जी व्यक्ती विमा घेते त्या व्यक्तीला विमाधारक असे म्हटले जाते.
५. इन्श्युर्ड (Insured) – विमा योजनेद्वारे ज्या व्यक्तीसाठी विमा उतरवला जातो, त्या व्यक्तीला इन्श्युर्ड असे म्हणण्यात येते.
६. विमा कंपनी – ही एक अशी कंपनी आहे जी विमाधारकाला विविध कारणांसाठी विमा उपलब्ध करून देते.
७. नॉमिनी (Nominee) – विमाधारकाच्या पश्चात ज्या नामनिर्देशित व्यक्तीला विमा कवचाचे फायदे मिळतात, त्या व्यक्तीला नॉमिनी असे म्हटले जाते.
८. परिपक्वता (Maturity)– विमा कालावधी संपत आल्यानंतर किंवा विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर विमा पॉलिसी परिपक्व झाली असे म्हणण्यात येते.
९. डेथ बेनिफिट (Death Benefit) – विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याने नमूद केलेल्या नामनिर्देशित व्यक्तीला विम्याची रक्कम ही एकरक्कमी किंवा मासिक उत्पन्नाच्या स्वरूपात मिळते, याला डेथ बेनिफिट असे म्हटले जाते.
१०. क्लेम (Claim) – विमा पॉलिसी परिपक्व झाल्यानंतर परिपक्वतेचा फायदा मिळवण्यासाठी विमा कंपनीला कराव्या लागणाऱ्या अर्जाला क्लेम असे म्हटले जाते.
११. सम अमाउंट (Sum Amount) – विमाधारकाला नुकसान झाल्यानंतर जी अधिकत्तम रक्कम देण्यात येते, त्या रक्कमेला सम अमाउंट असे म्हटले जाते.
जीवन आणि सामान्य विम्याचे प्रदाता | Life and General Insurance Providers
• जीवन विम्याचे प्रदाता खालीलप्रमाणे –
१. आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स
२. एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्स
३. एगॉन लाइफ इन्शुरन्स
४. अव्हीव्हा लाइफ इन्शुरन्स
५. बजाज आलियांज लाइफ इन्शुरन्स
• सामान्य विम्याचे (General Insurance) प्रदाता खालीलप्रमाणे –
१. आदित्य बिर्ला जनरल इन्शुरन्स
२. बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स
३. भारती ऍक्सा जनरल इन्शुरन्स
४. लिबर्टी जनरल इन्शुरन्स
५. फ्युचर जनरली जनरल इन्शुरन्स
निष्कर्ष | Conclusion
ही सगळी माहिती वाचल्यावर विमा भविष्याच्या दृष्टीने किती फायदेशीर आहे हे तुम्हाला नक्कीच कळले असेल. फक्त विमा घेताना विम्याच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल, विमा धोरणाबद्दल, विमा रक्कम, विम्यासाठी भरावी लागणारी प्रीमियमची रक्कम, विमा कालावधी, पात्रता निकष, विमा कंपनीच्या अटी आणि शर्थी याबद्दल संपूर्ण माहिती काळजीपूर्वक घेणे महत्वाचे आहे. ही माहिती (Insurance Information in Marathi) व्यवस्थितरीत्या घेतल्यास विमा हा तुम्हाला लाभदायक ठरू शकेल.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions
सामान्य विमा म्हणजे काय? आणि सामान्य विम्याचे वेगवेगळे प्रकार कोणते?
सामान्य विमा हा जीवन विमा नसून हा विमा जीवनाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी विमा उपलब्ध करून देतो. सामान्य विम्याचे विविध प्रकार खालीलप्रमाणे-
१.आरोग्य विमा
२.गृह विमा
३.वाहन विमा
४.यात्रा विमा
आरोग्य विमा हा कधी खरेदी करावा?
आरोग्य विमा हा तुम्हाला तुमच्या वैद्यकीय आपातकालीन काळासाठी संरक्षित कवच देऊ करतो. जे वैद्यकीय उपचार करण्याची गरज अचानकपणे संभवणाऱ्या आजारांमुळे निर्माण होते. अचानक येणाऱ्या आजारपणामुळे आरोग्य विम्यामध्ये लवकरात लवकर पैसे गुंतवणे हे भविष्याच्या दृष्टीने चांगले असते.
आरोग्य विम्याबाबतीत काही कर फायदे आहेत
होय. आरोग्य विमा असल्यास करदात्याला आयकर कायदा, १९६१ प्रमाणे सेक्शन ८०ड च्या अंतर्गत वजावट मिळते. म्हणून आरोग्य विमा असणे हे कराचे फायदे मिळवण्यासाठी देखील लाभदायक आहे.
विमा ऑनलाइन खरेदी करता येतो का आणि तसे करणे सुरक्षित आहे का?
होय. विमा तुम्ही ऑनलाइन पद्धतीने नक्कीच खरेदी करू शकता. बरेच विम्याचे प्रदाते हे विमा ऑनलाइन खरेदी करण्याची सेवा ग्राहकांना देतात. विमा ऑनलाइन खरेदी करण्याचे अनेक फायदे देखील आहेत. जसे की, साधेसोपे अर्ज, कमी रक्कमेचे प्रीमियम्स आणि सुरुवातीला सगळी कागदपत्रे काळजीपूर्वकरित्या वाचता येणे, इत्यादी.
विमा खरेदी करताना पात्रता निकष काय आहे?
विमा खरेदीसाठीचा पात्रता निकष हा तुम्ही कोणत्या प्रकारचा विमा खरेदी करत आहात, विमा धोरणाशी निगडित अटी आणि तुम्ही कोणता विमा प्रदाता निवडता यावर अवलंबून असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या विम्याचे वेगवेगळे पात्रता निकष असतात. जसं की, आरोग्य विमामध्ये तुमचे वय पाहण्यात येते आणि तुमची वैद्यकीय चाचणी करण्यात येते. तर यात्रा विम्यामध्ये प्रवासाचे स्वरूप पाहण्यात येते.