टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? | Term insurance information in Marathi

Term Insurance Information In Marathi – आजकाल अकाली मृत्यू येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अश्या वेळी आपल्या अकाली मृत्यूमुळे आपल्या कुटूंबाला काही आर्थिक अडचण येऊ नये, म्हणून आर्थिक दृष्टीने काहीतरी व्यवस्था करुन ठेवावी असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी टर्म इन्शुरन्स हा पर्याय अगदी उत्तम असा आहे. टर्म इन्शुरन्सबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत

अनुक्रमणिका

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ? | Term Insurance meaning in Marathi

टर्म इन्शुरन्स ही एक जीवन संरक्षण विमा योजना आहे. टर्म इन्शुरन्स विमाधारकाला येणाऱ्या अकाली मृत्यूचे जोखीम संरक्षण करते. त्यासाठी दर महिन्याला विमाधारकाला विम्याच्या समोर नियोजित रक्कम दरमहा भरावी लागते. टर्म इन्शुरन्स हा विमाच्या प्रकारांपैकी एक प्रमुख विमा प्रकार म्हणून ओळखला जातो. दरमहा कमीत कमी रक्कम भरून देखील जास्त रकमेचे विमाकवच या विम्यामध्ये मिळू शकते.

इन्शुरन्सची प्रमुख वैशिष्ट्ये | Important Features of Term Insurance

१. विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला किंवा आश्रिताला टर्म इन्शुरन्समुळे जमा झालेली रक्कम मिळते.

२. टर्म इन्शुरन्सची पॉलिसी कोणत्याही बाजारामधील उत्पादनांसोबत जोडलेली नसते.

३. टर्म इन्शुरन्समध्ये जोखीम आकलन मापदंडाप्रमाणे तपासणी ही अनिवार्य आहे.

४. टर्म इन्शुरन्स हा मृत्यू, अपंग किंवा विकलांग झाल्यास, गंभीर आजार, अंतिम आजार यामध्ये मिळतो.

५. टर्म इन्शुरन्सची पॉलिसी एका निश्चित वयापासून सुरू होऊन एका निश्चित वयापर्यंत विमाकवच देते. काही टर्म इन्शुरन्स पॉलिसी या पूर्ण आयुष्यासाठी देखील उपलब्ध असतात. जसं की वयाच्या ९९ वर्षापर्यंत देखील टर्म इन्शुरन्सची पॉलिसी आपण घेऊ शकतो.

६. पहिल्या १५ ते ३० दिवसात आपण घेतलेली टर्म इन्शुरन्सची पॉलिसी कॅन्सल केल्यास त्यासमोर आपल्याला पूर्णपणे परतावा मिळतो.

७. आपण घेतलेल्या टर्म इन्शुरन्स पॉलिसीसमोर आपण पैसे न भरल्यास ती पॉलिसी १५ ते २० दिवस अबाधित राहते आणि त्यानंतर ती लॅप्स होते.

टर्म इन्शुरन्सचे प्रकार | Types of Term Insurance in Marathi

१. मानक टर्म इन्शुरन्स- ही टर्म इन्शुरन्समधील साधी अशी योजना आहे. विमाधारक विमाखरेदी करताना कालावधी, प्रीमियमची रक्कम, विमाकवच, विमा भरावयाची पद्धत सुनिश्चित करण्यात येते. प्रीमियमची रक्कम आपण वार्षिक, अर्धवार्षिक, तिमाही किंवा मासिकरित्या भरू शकतो. पॉलिसीची मुदत ही आताच्या वयानुसार आणि निवडलेल्या 

परिपक्वता कालावधी यावर अवलंबून असते. या प्रकारामध्ये पॉलिसीच्या कालावधीमध्ये विमाधारकाचे निधन झाले, तरच त्याच्या वारसदाराला विमा रक्कम देण्यात येते. विमाधारक जर पॉलिसी कालावधीच्या समाप्तीनंतर देखील जीवंत असल्यास कोणतीही विमा रक्कम विमाधारकाला मिळत नाही. या प्रकारामध्ये फक्त मृत्यू स्थितीमध्ये लाभ आहे. शिवाय पॉलिसीच्या कालावधीत विमाकवच आणि प्रीमियमची रक्कम ही स्थिर राहते.

२. प्रीमियमचा टर्म रिटर्न (टी.आर.ओ.पी) टर्म रिटर्न ऑफ प्रीमियम (टी.आर.ओ.पी) या प्रकारात पॉलिसीची मुदत संपेपर्यंत विमाधारक जीवंत राहिल्यास भरलेल्या विम्याची रक्कम विमाधारकाला विमा कंपनीकडून परत केली जाते. ती विम्याची रक्कम त्यावेळच्या लागू करासह विमा कंपनीकडून आपल्याला परत केली जाईल. सामान्यतः या प्रकारामधील प्रीमियम हे प्रमाणित मुदतीच्या प्रकारांपेक्षा जास्त असतात.

. व्हेरिएबल टर्म प्लॅन- या प्रकारामधील विम्याला तुम्ही आयुर्विमा किंवा इंडोवमेन्ट प्लॅनमध्ये रूपांतरित करू शकता. तुम्ही या प्रकारातील टर्म इन्शुरन्सच्या पॉलिसीला संपूर्ण आयुर्विमामध्ये बदलू शकता. फक्त तसे करताना विमा कंपनीकडून योग्य त्या शुल्काची आकारणी केली जाते.

४. संयुक्त जीवन टर्म प्लॅन या टर्म इन्शुरन्सच्या प्रकारामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पॉलिसी घेऊ शकता. या प्रकारामध्ये तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला येणाऱ्या अकाली मृत्यूचे जोखीम संरक्षण केले आहे. हा टर्म इन्शुरन्स घेऊन तुम्ही स्वतःसाठी आणि जोडीदारासाठी विमाकवच घेऊ शकता.

५. ग्रुप टर्म इन्शुरन्स- हा इन्शुरन्सचा प्रकार हा व्यवसाय, नोकरी, कंपनी यामुळे जोडल्या गेलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विमाकवच उपलब्ध करून देतो. ह्या टर्म इन्शुरन्सच्या प्रकारामध्ये त्या समूहाचा भाग असलेल्या प्रत्येकाला जीवन विमा प्रदान केला जातो. हा प्रकार वैयक्तिक मुदतीच्या योजनेंप्रमाणेच असतो. ही टर्म इन्शुरन्सची पॉलिसी ही खास समूहासाठी तयार केलेली असते आणि एकत्रितरित्या पूर्ण समूहाला पैसे दिले जातात. शिवाय प्रीमियमची रक्कम ही दरवर्षी बदलत असते. एखाद्या व्यक्तीने तो समूह सोडल्यास ती व्यक्ती या योजनेचा भाग राहत नाही.

टर्म इन्शुरन्स साठी पात्रता | Eligibility for Term Insurance

१. जी व्यक्ती टर्म इन्शुरन्सची पॉलिसी घेत आहे ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. पण आजकाल PIO (Person of Indian Origin) आणि NRI (Non resident Indian) व्यक्ती देखील टर्म इन्शुरन्सचा लाभ घेऊ शकतात.

२. टर्म इन्शुरन्सची पॉलिसी घेताना पूर्णपणे वैद्यकीय तपासणी करून घेणे अनिवार्य असते. त्या तपासणीनंतर येणाऱ्या अहवालावरती विमाकवच आणि प्रीमियमची रक्कम अवलंबून असते.

३. ज्या व्यक्ती धूम्रपान करतात त्या व्यक्तींसाठी प्रीमियमची रक्कम ही जास्त असते. या व्यक्ती मृत्यूला लवकर बळी पडण्याची शक्यता असल्यामुळे या व्यक्तींसाठी जोखीम संरक्षण हे जास्त रक्कमेचे असण्याची गरज असते. 

४. जी व्यक्ती टर्म इन्शुरन्ससाठी लागणारी योग्य ती कागदपत्रे विमा कंपनीसोबत जमा करेल, ती व्यक्ती टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी पात्र असते.

टर्म इन्शुरन्स वयोमर्यादा | Age Limit for Term Insurance

टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी कमीत कमी वयाची मर्यादा ही १८ वर्षे असावी लागते आणि जास्तीत जास्त वयाची मर्यादा ही ६५ वर्षापर्यंत असते. बरेचसे टर्म इन्शुरन्स प्लॅन हे परिपक्वतेचे फायदे देत नाही. पण काही टर्म इन्शुरन्स प्लॅनमध्ये सरासरी वयाची मर्यादा ही ६५ ते ७० वर्षे एवढी असते.

टर्म इन्शुरन्ससाठी लागणारी कागदपत्रे | Required Documents for Term Insurance

१. वयाचा दाखला- पासपोर्ट, वाहन चालक परवाना, शाळा बदल प्रमाणपत्र, पॅन कार्ड

२. रहिवासी पुरावा- पासपोर्ट, वाहन चालक परवाना, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, दूरध्वनी, गॅस किंवा विजेचे देयक, रेशन कार्ड

३. ओळखपत्र- पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, मतदान ओळखपत्र

४.पासपोर्ट साइज फोटो

५. उत्पन्नाचा दाखला- नोकरी किंवा व्यावसायिक उत्पन्नाचा दाखला, मागील तीन वर्षांचा आयकर रिटर्न

६. फॉर्म १६ अनिवार्य

टर्म इन्शुरन्स कसा खरेदी करायचा? | How to purchase Term Insurance?

टर्म इन्शुरन्स प्लॅन हा ऑनलाइन आणि ऑफलाइन अश्या दोन्ही प्रकारे घेता येतो. तुम्ही त्या विमाकंपनीच्या वेबसाईटला भेट देऊन टर्म इन्शुरन्स खरेदी करू शकता किंवा तुमची योग्य ती कागदपत्रे तुमच्या जवळच्या शाखेला भेट देऊन जमा करू शकता. शिवाय तुम्ही टर्म इन्शुरन्स हा Agent किंवा Broker च्या सहाय्याने देखील खरेदी करू शकता.

सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स प्लान कसा निवडावा? | How to choose Good Term Insurance Plan In Marathi?

१. अश्या पॉलिसीची निवड करावी, जी तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या परिवाराला योग्य तो लाभ मिळवून देण्यास मदत करेल. शिवाय वर्तमानातील वयानुसार अधिक रकमेची पॉलिसी निवडावी.

२. तुमचे कुटुंब मोठे असेल तर वाढते विमाकवच असलेला टर्म इन्शुरन्स प्लॅन निवडावा.

३. असे राइडर्स निवडा जे तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळवून देतील. सगळे राइडर्स तुमच्यासाठी फायद्याचे असतील किंवा नसतील देखील

४. प्रत्येक विमा कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्लॅन्सची तुलना नक्कीच करा. जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या विमा कंपनीबद्दलची माहिती मिळू शकेल.

५.ऑनलाइन टर्म इन्शुरन्स खरेदी केल्यास तुम्हाला प्रीमियमच्या रक्कमेवरती बचत करण्यास मदत होऊ शकते.

तुम्हाला online बरेच पर्याय उपलब्ध आहेत. term insurance LIC,SBI term insurance plan आणि बरेच इन्शुरन्स कंपनी तुम्हाला वेगवेगळे पर्याय देतात. तुम्ही आपल्या गरजे नुसार सर्व Policy मुदत आणि अट वाचून तुमची टर्म प्लान विकत घ्यावा.

टर्म इन्शुरन्सची आवश्यकता कोणाला असते? | Who required the Term Insurance?

१. जर तुम्ही घरातील जास्त उत्पन्न कमावणारी व्यक्ती असाल. शिवाय तुमच्यावरती अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त असेल तर 

२. तुम्ही काही गंभीर आजाराने ग्रासलेले असाल. ज्यामध्ये मृत्यू हा अटळ आहे अश्या परिस्थितीत

३. पालक, व्यावसायिक, नोकरी करणाऱ्या व्यक्ती शिवाय तरुण पिढी ज्यांच्यावर बरेच शैक्षणिक कर्ज आहे अश्या व्यक्तीदेखील

टर्म इन्शुरन्स योजना का आवश्यक आहे? | Why Term Insurance Plan Is Important?

आजकाल कोणत्याही व्यक्तीचे जीवन हे सुनिश्चित नाही आहे. त्यामुळे आपल्या अकाली मृत्यूनंतर आपल्या परिवाराला काही आर्थिक अडचणी येऊ नयेत यासाठी टर्म इन्शुरन्स योजना महत्वाची भूमिका बजावते. आपल्या मृत्यूनंतर विम्यासाठी असणाऱ्या नामनिर्देशित व्यक्तीला अपेक्षित रक्कम देण्यात येते. पण पॉलिसीची मुदत संपल्यानंतर विमाधारकाचा मृत्यू झाल्यास मृत्यूचा लाभ हा शून्य आहे आणि हा घटक तुम्ही कोणत्या योजनेची निवड करता यावर अवलंबून आहे.

टर्म इन्शुरन्स पॉलिसी कशी काम करते? | How Term Insurance Policy work?

तुम्ही कोणत्या टर्म इन्शुरन्स प्लॅनची निवड करता, त्यावर तुमच्या मृत्यूनंतर मिळणारी रक्कम अवलंबून असते. विमाधारकाच्या मृत्यूनंतर एकत्रित मिळणारी रक्कम तुम्ही मासिकरित्या देखील प्राप्त करू शकता. शिवाय तुम्ही एका टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा विस्तार करून त्यामध्ये वेगवेगळे राइडर्स समाविष्ट करून एकच पॉलिसी वेगवेगळ्या कारणांसाठी म्हणजेच अपंग किंवा विकलांग व्यक्ती, गंभीर आजार किंवा दुर्घटना मृत्यू झालेली व्यक्ती यासाठी लाभ घेऊ शकता.

टर्म इन्शुरन्स प्रीमियम किंवा जोखीम संरक्षण किती रकमेचे असते? | How much the Premium Amount or Risk Protection in case of Term Insurance?

प्रीमियमची गणना ही वय, विमा राशी, लिंग, धूम्रपान करणारी व्यक्ती किंवा न करणारी व्यक्ती, वार्षिक उत्पन्न, वैद्यकीय परीक्षा अहवाल या घटकांवर अवलंबून असते. विमा कंपनीच्या वेबसाइटवरील प्रीमियम कॅल्क्युलेटर तुम्हाला सरासरी प्रीमियमच्या रक्कमेची माहिती करून देण्यास मदत करतो. अंतिम निर्णय हा विमा कंपनीच घेते. पण प्रीमियम कॅल्क्युलेटर तुम्हाला वार्षिक प्रीमियमचे एक बजेट तयार करायला मदत करू शकतो. शिवाय जोखीम संरक्षणाची रक्कम ही आपण कोणत्या जोखीमेसाठी विमा घेत आहोत त्यावर अवलंबून असते.

टर्म इन्शुरन्सचे फायदे | Advantages of Term Insurance

१. कुटूंबाच्या आर्थिक संरक्षणासाठी

२. भविष्यातील काही महत्वाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी 

३. कर बचतीसाठी

४. अधिक जोखमीच्या फायद्यासाठी

५. कमी किंमतीवर विमा काढलेल्या मोठ्या रक्कमेसाठी

६. खूप कमी दावा नकार प्रकरणाची शक्यता

७. विमा हफ्ता भरण्यास सुलभता

८. काही योजनांमध्ये भरलेल्या विमा हप्त्यांचा परतावा

टर्म इन्शुरन्समधील कर फायदा | Tax Benefit In Term Insurance

टर्म इन्शुरन्ससमोर भरलेल्या प्रीमियमचा फायदा आपण सेक्शन 80C च्या अंतर्गत घेऊ शकतो. या सेक्शनच्या अंतर्गत आपण एक लाख पन्नास हजार या रकमेपर्यंत deduction घेऊ शकतो.

निष्कर्ष | Conclusion

भविष्यात घडणाऱ्या अचानक घटनांमुळे त्यावेळी आर्थिक अडचण न जाणवण्यासाठी वर्तमानकाळात त्याची आपल्याला काही तजवीज करून ठेवायची असेल तर टर्म इन्शुरन्स हा एक खूप चांगला पर्याय आहे. शिवाय टर्म इन्शुरन्स हा पर्याय कर फायदे आणि इतर फायदे बघता लाभदायी असा आहे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions

१. टर्म इन्शुरन्समध्ये किती रक्कमेचे विमाकवच खरेदी करावे?

तुमच्या अनुपस्थितीत कुटूंबाला किती आर्थिक अडचण येऊ शकते?, मुलाच्या शिक्षणासाठी भविष्यात किती खर्च येऊ शकतो? अशा प्रकारच्या घटनांच्या आधारावर टर्म इन्शुरन्समध्ये विमाकवच किती रक्कमेचे घ्यायचे हे तुम्ही ठरवू शकता.

२. वयाच्या कोणत्या वर्षी टर्म इन्शुरन्स खरेदी करावा?

टर्म इन्शुरन्स घ्यायची अशी कोणती ठरलेली वेळ नाही आहे. फक्त टर्म इन्शुरन्स घेण्यासाठीचे कमीत कमी वय हे १८ असावे. जर तुमच्या आर्थिक उत्पन्नावर तुमचे कुटुंब अवलंबून असेल, तर लवकरात लवकर टर्म इन्शुरन्स खरेदी करणे तुमच्या फायद्याचे आहे.

३. टर्म इन्शुरन्सचा कालावधी किती असावा?

तुम्हाला वेगवेगळ्या योजनांमधून अधिक कालावधीची योजना निवडायला हवी. जेणेकरून तुमच्या कुटूंबाची आर्थिक सुरक्षा तुम्ही योग्यप्रकारे करू शकाल.

४. २ टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेणे बरोबर आहे का?

तुमच्या बदलत्या गरजा आणि देणी बघता अतिरिक्त विमाकवच घेण्यात काहीच नुकसान नाही आहे. तुम्ही एकावेळी २ टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करू शकता. फक्त नवीन टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करताना तुमच्या आधीच्या टर्म इन्शुरन्स प्लॅनची माहिती त्यामध्ये द्या. कारण त्याचा प्रभाव हा नवीन टर्म इन्शुरन्सच्या विमाकवच वरती होत असतो.

५. मी कधीकधी धूम्रपान करतो तरी मला तंबाखूसेवन करणारा म्हणून घोषित करण्याची गरज आहे?

होय. जरी तुम्ही कधीकधी धूम्रपान करत असाल तरी तुम्हाला तंबाखूसेवन करणारा म्हणून घोषित करण्याची गरज आहे. चांगली योजना आणि प्रीमियम निवड करताना तुमचा सगळा वैद्यकीय इतिहास हा महत्वाचा आहे.

शेअर करा